अनुवाद – डॉ. वसुधा सहस्रबुद्धे
संध्याकाळी मुलगा घरी येताच घरात आंब्याचा सुगंध पसरला .कमलाबाईंनी पटकन विचारलं ,” हापूसचे आंबे घेऊन आला का रे ?”मुलगा काहीतरी उत्तर देणार त्या आधीच सून म्हणाली , “ नाही हो ! ” परंतु त्यांनी सुनेला पिशवी लपवून पटकन घरात जाताना बघितलं होतं. त्यांच्या मनाचे जणू दोन तुकडे – दोन फोडी झाल्या .
कितीतरी वेळ आपल्या समोरच्या बेचव जेवणाकडे त्या बघत होत्या . मग हळू हळू त्यांचं लाचार विझलेलं मन रागाने जळफळू लागलं . त्यांना काय माहित नव्हतं परवाच्या दिवशी खीर केली होती आणि दोन दिवसांपूर्वी गोडाचा शिरा सुद्धा केला होता ! परंतु त्यांना काय मिळालं ? तिच नेहमीची दुधीची भाजी आणि पातळ आमटी. मान्य आहे की त्यांची शुगर जास्ती आहे ,परंतु सगळी औषधं घेते आहे ना ?चालते – फिरते आहे . घरातली लहान मोठी कामं सुद्धा करते आहे… आणि “आई जरा भाजी निवडून द्या ना .. बाळाला तेल लावणं तर तुमच्या सारखं कोणालाच जमत नाही. आणि हो तुमच्या हातची फोडणीची मिरची खावीशी वाटते. “ अशा एकेक फर्माइश करताना माझ्या आजारपणाची आठवण होत नाही. मग घास भर गोड देताना जीव वर खाली का होतो ?
चिडलेलं मन धग धगू लागलं . म्हणून त्या उठल्या आणि आतल्या खोलीत जाऊ लागल्या. व्हरांडा ओलांडताना अचानक त्यांची नजर कोपऱ्यातील निरुपयोगी वस्तूंनी झाकलेल्या वेताच्या खुर्चीकडे वळली. त्या तिथेच थबकल्या… सुन्न होऊन .. खुर्चीकडे बघत राहिल्या.
मग पावलं ओढीत त्या मागे फिरल्या . आता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. आठवत होता एक केविलवाणा आवाज ,” सुनबाई , एखादी फोड दे ना, अगदी लहानशी…